नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे रुपांतर वादळात होऊ शकते. त्यामुळे पाच राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. या पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळ निर्माण झाल्यास १२ ऑक्टोबरच्या रात्री नरसापूर आणि विशाखापट्टणमच्या मधे आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. पार होऊ शकते. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये १३ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.