भंडारा  (प्रतिनिधी) :  भंडारा दुर्घटनेची चौकशी कऱण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.  या प्रकरणाची चौकशी करताना कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे दिला.  भंडाऱ्यातील रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या १० चिमुरड्यांच्या  कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केले.

बालकांचे  जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केले तरीही ते परत आणता येणार नाहीत. दुर्घटनेनंतर जे होते, ते आधी का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना संकट असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे का, याचीही चौकशी केली जाईल. हा प्रकार अचानक घडला की वारंवार तक्रारी येत असतानाही अनास्थेमुळे हा प्रकार घडला,  त्याचीही चौकशी कऱण्यात येईल,  असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी  मार्गदर्शक सूचना घालून देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचे  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.