मुछें-दाढी हो तो देवर्डे के बालासाहब तानवडे जैसी हो… वरना ना हो..!

0
587

आजरा (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांचा अप्रतिम अभिनय असलेला ‘शराबी’ हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. त्यामधील गाण्यांप्रमाणे एक संवाद खूपच लोकप्रिय झाला होता. झुपकेदार मिश्या असलेल्या ‘मुक्रीं’कडे पाहून अमिताभ म्हणतात, ‘’कुछ भी हो, लेकीन मुछेंं हो तो हमारे नथ्थुलाल जैसी हो… वरना ना हो…’’ अर्थात, मुक्री यांच्या त्या मिश्या ह्या चित्रपटापुरता ‘खऱ्या’ होत्या, वास्तवात नव्हत्या. मात्र, त्याच मुक्री यांची आठवण करून देणाऱ्या खऱ्याखुऱ्या मिश्या आणि हो, दाढीही असलेल्या आपल्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने चक्क राष्ट्रीय स्तरावरील ‘दाढी-मिशी’ स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलाय. त्यांचं नाव आहे, बाळासाहेब तानवडे…

बाळासाहेब तानवडे हे आजरा तालुक्यातील देवर्डे गावचे रहिवासी… पेशाने इंजिनिअर असलेले तानवडे हे सध्या मुंबईत इन्स्टंट फूडचा व्यवसाय करतात. त्यांना दाढी-मिशी व्यवस्थितरीत्या राखण्याची हौस आहे. पांढरीशुभ्र दाढी व झुबकेदार मिशा ही त्यांची खासियत आहे.. त्यांनी मिश्या व दाढीचे संगोपन चांगले केले आहे.

मागील काही वर्षांपासून परदेशाप्रमाणे भारतातही थोड्या ‘हटके’ स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. जयपूर येथील ‘हेवन सेवन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चक्क ‘मिस्टर इंडिया-दाढी-मिशा’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील हजारांहून अधिक स्पर्धकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता. त्यामधून अंतिम स्पर्धैसाठी ५० स्पर्धकांची निवड झाली. यामध्ये बाळासाहेब तानवडे यांनी विजेतेपद पटकावले. त्यांची दाढी व मिशी कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यामुळे आता बरेचजण म्हणत असतील, ‘मुछेंं-दाढी हो तो बालासाहब तानवडे जैसी हो… वरना ना हो…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here