अमरावती (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या पध्तीने घरात जावा आणि दिराचे भांडण होत असते, त्या पध्दतीने सरकारमध्ये भांडणे होत आहेत. जबरदस्तीने सरकारमध्ये राहिल्याने एकमेकांचे विचार पटत नाहीत, अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना दिसू लागले आहे, त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर वेगळे व्हावे, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जात आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होऊ लागले आहेत. शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मौन धारण केले आहे. यावरून नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात विचार जुळत नसताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे विचार जमत नसेल, तर तुम्ही एकमेकांपासून वेगळे व्हा, असा सल्ला राणा यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केल्यास विकास होणार आहे का ? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. यावर अजूनही देशात औरंगजेबाबद्द्ल प्रेम आहे का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.