नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करून सत्ता खेचून आणण्याचा चंग बांधला आहे. पण तृणमूलच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करून भाजपला आव्हान दिले आहे. हे ट्विट जपून ठेवा. आणि जर भाजपने १० जागा जिंकल्या, तर मी ट्विटर सोडून देईन, अशी घोषणाच किशोर यांनी केली आहे.

माध्यमातील एक वर्ग भाजपच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होत आहे की, भाजप दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझे आवाहन आहे की, हे ट्विट जपून ठेवा आणि जर भाजपने चांगले प्रदर्शन केले, तर मी ट्विटर सोडून देईन.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या या ट्विटला भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी आली आहे. त्यामुळे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाला एक रणनीतीकार गमवावा लागेल, असा टोला विजयवर्गीय यांनी लगावला आहे.