इस्लामपूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर एक महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. यावरून भाजप नेते व माजी मंत्री आशिष शेलार यांनी  निशाणा साधला. शेट्टींची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी खोचक टीका शेलार यांनी केली. ते आज (गुरुवार) येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

 

शेलार म्हणाले की, विधान परिषदेच्या आमिषाने  शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी अडत-दलालांंसाठी महाविकास आघाडीचे तुणतुणे घेऊन उभे आहेत. त्यांनी आता वकिली सुरू केली आहे. सत्तरच्या दशकात ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट गाजला होता. या चित्रपटात मोहापायी एका आदर्श शिक्षकावर तमाशाच्या फडात तुणतुणे घेऊन उभे राहण्याची वेळ येते. तशी अवस्था शेट्टी यांची आता झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फुले, आंबेडकर, शाहू यांच्या विचाराच्या विरोधात काम सुरू आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच तयार केलेले आहेत. परंतु आडत, दलाल यांच्या पाठिराख्यांकडून या कायद्याला विरोध सुरू आहे.