कोल्हापूर (प्रतिनिधी) : बापट कँम्प येथील कत्तलखान्याचे बेजबाबदार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी आज (सोमवार) येथे दिला. 

कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बापट कँम्प येथील कत्तलखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या भोंगळ कारभाराविरोधात आजपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रसंगी ते बोलत होते.

पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील हे महापालिका प्रशासनाने नेमून दिलेले काम न करता बेजबाबदारपणे महापालिकेच्या प्रोजेक्ट इंजिनिअरच्या जबाबदारीचे काम करत आहेत. तर कत्तलखान्यामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या बकऱ्यांची तपासणी न करताच त्यांची कत्तल व विक्री केली जाते. तसेच डॉ. विजय पाटील यांनी महापालिकेतील काही नगरसेवकांना हाताशी धरून काही ठराव मंजूर करुन घेतले आहेत. आणि त्या माध्यमातून आपल्या मर्जीतील लोकांचा आर्थिक फायदा करून देण्याचे काम करत आहे, असाही आरोप जयराज कोळी यांनी यावेळी केला. तरी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉ. विजय पाटील यांना बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा यावेळी जयराज कोळी यांनी दिला आहे.

या आंदोलनात उपाध्यक्ष दगडू माने यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या आहेत.