कळे  (अनिल सुतार) :  सध्याच्या युगात एकत्र कुटुंबाची प्रथा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आई-वडिलांशी पटत नसल्याने एकलुत्या एका मुलाने फारकत घेऊन वेगळी चूल मांडल्याचे प्रकार समाजात घडत आहेत. नातेसंबंध, प्रेम, आस्था, आपुलकी, ऐक्य याला तिलांजली देत विभक्त कुटुंब पध्दती जोर धरत आहे. भावाभावांमध्ये  हरवत असलेले प्रेम व संस्कार याला कारणीभूत ठरत आहे.

पण त्यातही काही कुटुंबे आजही समविचाराने एकत्रित राहत असलेली दुर्मिळ उदाहरणे दिसून येत आहेत. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ७०० लोकसंख्या असलेले हरपवडेपैकी निवाचीवाडी (ता.पन्हाळा) येथील कुदळे कुटुंबीय…

मारुती राऊ कुदळे व बनाबाई मारुती कुदळे  या दाम्पत्याला पाच मुले. गणपती, गोविंदा, विष्णु, श्रीपती व पांडुरंग हे ५ भाऊ आईसह एकत्र राहतात. त्यांची मुले, सुना नातवंडे असे एकूण ३० सदस्य आजही एकत्र गुण्यागोविंद्याने राहत आहेत. सर्वजण एकाच चुलीवर जेवण करतात,  घरात कोणीही एकटा मालक नाही. कोणताही भांडण तंटा न करता सर्वजण प्रेम, जिव्हाळा आणि समविचाराने काम करत  कुटुंबकबिला चालवत आहेत.  त्यांच्यामध्ये  कोणत्याही कारणाने मतभेद होत नाहीत.  सुखदु:खाच्या प्रसंगी एकोप्याने राहतात. कुटुंबासमोरील अडीअडचणीवर एकत्र बसून मार्ग काढतात.  धामणी  खोऱ्यातील या  एकत्र कुटुंबाचा आदर्श इतरांनीही घेणे काळाची गरज आहे.  दरम्यान, २०१४ मध्ये मारुती कुदळे यांचे निधन झाले.  वडिलांच्या  पश्चात त्यांच्या शिकवणीनुसार  हे पाच भाऊ आजतागायत एकत्रित राहत आहेत.  हे  एकत्र कुटुंब समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.