कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने राज्यसभेत व लोकसभेत पाशवी बहुमताच्या बळावर लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून शेतकरी विरोधी विधयक मंजूर करून घेतली आहेत. असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तर या विधयकांचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसून देशातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

याचा निषेध म्हणून उद्या (शुक्रवार) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी विरोधी विधेयकांच्या प्रतींची होळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.