कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा बुडवला आहे. हा जुना विषय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांनी २०१४ ते २०२१ या कालावधीतील सुमारे १५ कोटी रुपयांचा घरफाळा भरून जुना विषय संपवावा आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावी. थकीत घरफाळा कधी भरणार ? हे आधी पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे थेट आवाहनच माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकातून दिले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, डीवायपी सिटी मॉलमधील भाडयाने दिलेल्या मिळकती स्वतःच्या वापरात दाखवून पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा बुडवला आहे. यावर उत्तर देताना पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन धादांत खोटे बोलत आहेत. आता तर महापालिका प्रशासनावर खापर फोडून स्वतःचा बचाव करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. २४ ऑक्‍टोबर २०१४ रोजी महापालिकेने डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्र पाठवून माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर १८ ऑक्‍टोबर २०१९ रोजी संजय ज्ञानदेव पाटील यांना मिळकतीमधील भाडेवापर माहिती आणि करारपत्र सादर करण्याबाबत महापालिकेने पत्र पाठवले आहे. घरफाळा वसूल करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर   दबाव टाकला जातो. तसेच त्यांना दमदाटीही केली जाते. जर पालकमंत्री घरफाळा भरणार नसतील, तर सामान्य जनतेने घरफाळा का भरावा, असा सवाल पत्रकात कऱण्यात आला आहे.