कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४०० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज (शुक्रवार) मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावांत ईर्षा, चुरस असते, मात्र जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एका गावांत मात्र मतदानच झाले नाही. विशेष म्हणजे उमेदवारांनीही मतदान केले नाही. हा आश्चर्यजनक प्रकार घडलाय पेरीड येथे.

पेरीड येथे मागील ६५ वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. यंदा एका जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. या प्रभागात दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, पण दोन्ही उमेद्वारांसह कुणीच मतदान केलं नाही. काल रात्री गावात एक मिटिंग झाली. त्या मिटिंगनुसार आज मतदारांसह जे दोन उमेदवार रिंगणात होते त्या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यामुळे एका जागेवरची निवडणूक अजूनही अधांतरीच आहे. इतर वॉर्डात बिनविरोध निवडणूक झाली असली तरी या वॉर्डातील निवडणूक आता पुन्हा बिनविरोध होणार की मतदान होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.