पुणे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे इच्छुक उमेदवारांची गडबड उडाली आहे. या निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर गर्दी होत आहे. यामुळे ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी, २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी जात प्रमाणप! पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करण्याची पावती जोडणे बंधनकारक केले आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावली आहे. यामुळे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती व तक्रारी करणारे फोन मेसेज येत होते. त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे म्हणाले. याचा फायदा जिल्ह्यासह राज्यातील आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना होणार आहे.