कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने संगणक प्रणालीद्वारे दिनांक २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करताना २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून तांत्रिक अडचणी जसे इंटरनेटची  गती कमी, सर्व्हर डाऊन होणे इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही बाब विचारात घेता, इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने सादर करण्यासाठी मान्यता दिली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.