नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्याविरोधात नवी दिल्लीत मागील दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारशी शेतकरी नेत्यांच्या चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या होत्या. मात्र, तोडगा निघाला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली चर्चा ही निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन आणखीनच तीव्र केले. कृषी कायद्यात बदल करण्यास केंद्र सरकार तयार असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. 

विरोधी पक्षांनी एकत्र येत या आंदोलनाला पाठिंबा दिला. केंद्र सरकारवर सर्व थरातून टीकेची झोड उठली. देशाच्या राजधानीत आंदोलन सुरू असल्याने त्याची दाखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. शेतकरी, नागरिकांतील वाढता रोष पाहून अखेर केंद्र सरकार नरमले आहे. कृषी कायद्यात बदल करण्यास केंद्र सरकार तयार असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे. शेतकरी नेत्यांनी बदल करण्याविषयीचे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी केले आहे. यावर आता शेतकरी नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.