प्रतिनिधी (जळगाव) :  एका जुन्या जानेवारी २०१८मध्ये घडलेल्या प्रकरणात  भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली होती. त्यावेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा  आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाचा नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पराभव केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत होता. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू होता.  तर  भोईटे गटाला तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे  दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे.