गडहिंग्लज (प्रतिनिधी) : वाढीव वीजबील प्रकरणात उर्जामंत्री नितीन राऊत  आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजबीलासंदर्भात यूटर्न घेतल्याने त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गडहिंग्लज मनसेने केली आहे. या बाबतचे निवेदन आज (बुधवार) गडहिंग्लज पोलीस स्टेशनमध्ये मनसेने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सर्वसामान्य लोकांना वाढीव बीजबील देण्यात आले. हेच वाढीव वीजबील कमी करुन लोकांना दिलासा देऊ, असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं. मात्र, काहीच दिवसांत त्यांनी आपल्या आश्वासनावर यूटर्न घेतला. आपल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे लक्षात आल्यानंतर उर्जामंत्र्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. वीज ग्राहकांनी वीज बील भरलं नाहीतर महावितरणनं वीज कापण्याचा इशारा दिलाय. सरकारचा हा निर्णय चुकीचा घेतला आहे. त्यामुळे सरकारने भानावर येऊन ज्या जनतेने आपल्याला सेवेची संधी दिली त्या जनतेच्या भल्याचे निर्णय घ्यावेत, असे मनसेने म्हटले आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, प्रभात साबळे, अविनाश ताशीलदार,  प्राजक्ता पाटील, शीतल खनदाळे, विनायक चौगुले, सातगोंड पाटील, जिया उटी, दीपक लोखंडे, निलेश मांडणीत, सौरभ पाटील, सागर कुंभार, सुनिल नाईक, अवधूत मुळे आदी उपस्थित होते.