जळगाव (प्रतिनिधी) : ‘अमर रहे, अमर रहे, यश देशमुख अमर रहे, भारतमाता माता की जय’ च्या जयघोषात शहीद जवान यश देशमुख (रा. पिंपळगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज (शनिवार) सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो जळगावकरांनी जड अंत:करणाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.

यश देशमुख अवघे २१ वर्षांचे होते. श्रीनगरमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यश यांना वीरमरण आले. जून २०१९ मध्ये लष्करी सेवेत रुजू झाल्यावर त्यांची पहिलीच पोस्टिंग श्रीनगरमध्ये झाली होती. यश हुतात्मा झाल्याचे वृत्त समजल्यावर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. आज सकाळी त्यांचे पार्थिव पिंपळगाव येथे आणण्यात आले. गावानजीक असलेल्या माळरानावर त्यांच्यावर आज सकाळी ११.३० च्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भावाने मुखाग्नी देताच अनेकांचे डोळे पाणावले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.