कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने सापळा रचून एकास अटक केली. दिवाकर लाडू गवस (वय 39, रा. साटेली, जि. सिंधुदुर्ग) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि एक वाहन असा 4 लाख 42 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री चंदगड तालुक्यातील पार्ले गावाजवळ करण्यात आली.

चंदगड तालुक्यातील तिलारी घाटामार्गे काही लोक गोवा बनावट मद्याची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर च्या विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दोन पथके स्थापन करून शनिवारी मध्यरात्री या मार्गावर सापळा रचला होता. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक व्यक्ती सुमोतून संशयास्पद साहित्य घेऊन गोव्याहून तिलारी घाटमार्गे पार्ले या गावांमध्ये जात असल्याची माहिती एका पथकाने बरगे यांना फोनवरून कळवली.

त्यानंतर दुसऱ्या पथकाने पार्ले गावाजवळ या संशयित वाहनातील व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या सुमोमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे विविध कंपन्यांचे मद्याचे 63 बॉक्स आढळून आले. यामध्ये वाहतूक करणाऱ्या दिवाकर गवस याला अटक करण्यात आली त्याच्याकडून सुमो व गोवा बनावटी मद्यसाठा असा 4 लाख 42 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिवाकर गवस याने हा मद्यसाठा पार्ले येथील शिवाजी गावडे याचा असल्याचे सांगितले. मात्र, शिवाजी गावडे हा फरारी झाला असून त्याच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी बरगे, मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, अजय वाघमारे संदीप जानकर सचिन काळेल, सागर शिंदे, मारुती पोवार, जय शिनगारे, राजेंद्र कोळी यांनी केली.