पणजी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे पाच वेळा खासदार राहिलेले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे मोहन रावले यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. आज (शनिवार) सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रावले हे मुंबईतील परळ-लालबाग भागातील अत्यंत लोकप्रिय नेते होते. १९९१ ते २००९ या काळात दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. अत्यंत साधी राहणी आणि सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते गिरणी कामगाराचे पुत्र होते. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी संसदेचे काम थांबवले होते.अनेकदा त्यांनी गिरणीकामगारांच्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलने केली होती.