नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासह कार्यालयामध्ये सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ४४ हून अधिक ठिकाणी ३ हजार ७९० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. तर चालकाच्या नावे २०० कोटींची  संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी आणि शुक्रवारी ईडीने केलेल्या कारवाईमध्ये गायत्री प्रजापतींबरोबरच त्यांची मुले आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्रे  ११ लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा, ५ लाख किंमतीचे स्टॅम्प पेपर, पुण्यामध्ये कोट्यावधींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटींच्या संपत्तीचे पुरावे सापडले आहेत. लखनऊमध्ये प्रजापती कुटुंबाने ११० एकर जमीन खरेदी केल्याचेही या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. २०१९ साली ऑगस्टमध्ये गायत्री यांच्याविरोधात हवाला कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या गायत्री प्रजापती  सामुहिक बलात्कार प्रकरणी तुरुंगात आहेत. तर त्यांचा मुलगा आर्थिक घोटाळ्यांच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये आहे.