मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेसोबत आघाडी केल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. परंतु या चर्चांना छेद देणारे  विधान पवार यांनी केल्याने ते महत्त्वाचे मानले जात आहे. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज (बुधवार) आयोजित विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी‌ अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे असल्याने जुळवून घ्यावे लागेल. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, या बैठकीत विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झालेल्या उमदेवारांना मिळालेली मते, त्यांचा मतदारसंघातील प्रभाव, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, यासह उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करून त्यावर मार्ग काढण्याबाबत ऊहापोह करण्यात आला.