कोल्हापूर (प्रतिनिधी) : भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यामुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. अशा कृषी उत्पादनास भौगोलिक चिन्हांकन, मानांकन प्राप्त करण्यासाठी पणन महामंडळामार्फत चार योजना तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष एस.घुले यांनी दिली.

उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. ते वर्षानुवर्षे कायम राहत असतील तर अशा उत्पादनांची नोंदणी भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालय चेन्नई येथे करावी. अशा उत्पादकांना सुरवातीस दहा वर्षे, इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादकांपासून भेसळ होणे, रास्त किंमतीपेक्षा कमी किंमत मिळणे या सारख्या गोष्टींपासून संरक्षण मिळते. पुन:श्च संरक्षण कालावधी वाढविता येतो. पणन मंडळाच्यावतीने राज्यातील चार स्वतंत्र योजना तयार करण्यात आल्या आहेत. भौगोलिक चिन्हांकन, मानांकन बाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांची नोंदणी करणे तसेच या शेतमालाची विक्री व्यवस्था निर्यात याबाबत कामकाज करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नोंदणी करावयाच्या संस्था आणि कृषी पणन मंडळ कामकाज करेल.