मेलबर्न (वृत्तसंस्था) : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये जेवण केल्याने टीम इंडियाचे पाच खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता आहे. याची चौकशी बीसीसीआयने सुरू केली आहे. या पाचही खेळाडूंचे हॉटेलमध्ये जेवतानाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या पाच जणांचा मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंनी बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हे खेळाडू चेडस्टन शॉपिंग सेंटरच्या बारबीक्यू रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टीम इंडियाचे खेळाडू जेवायला आल्याचे सांगितले. कोरोना व्हायरसमुळे दोन्ही खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना कडक निर्बंध लावले आहेत. खेळाडूंना बाहेर जाऊन खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना हॉटेलच्या बाहेर बसण्याची परवानगी दिली आहे. पण या फोटोंमध्ये टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलच्या आतमध्ये बसून जेवत आहेत. त्यामुळे त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे.