नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने  इतर देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. भारतात बुधवारपासून (२३ डिसेंबर) ब्रिटनमधून येणारी विमान बंद केली आहेत. दरम्यान, त्याआधी आलेल्या प्रवाशांपैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दिल्ली विमानतळावरूनच पोबारा केला. त्यामुळे त्यांचा शोध घेताना प्रशासनाची तारांबळ उडाली.

त्यातील तीन जणांना शोधून प्रशासनाने त्यांना दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल केले. तर एक कोरोनाबाधित लुधियाना तर दुसरा आंध्र प्रदेशात पळून गेला. त्यांनाही बुधवारी अधिकाऱ्यांनी परत आणले आहे. पाचही जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. तसेच क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळेच   ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या पाच प्रवाशांनी विमानतळावर उतरल्यानंतर अधिकाऱ्यांना चकवा देत पळ काढला.