चंदगड (प्रतिनिधी) : दौलत (अथर्व) कारखान्यातील मळी मिश्रित पाणी ताम्रपर्णी नदीत मिसळून येथील जल जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यामध्ये तांबुळवाडी, बसर्गे, माणगाव गावानजीक शेकडो मासे मरून पडले असून या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटल्याने स्थानिक हैराण झाले आहेत. त्यामुळे दौलत (अथर्व) साखर कारखाना प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी येथील मच्छीमार आणि ग्रामस्थ करत आहेत. 

ताम्रपर्णी नदीमध्ये दौलत साखर कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी थेट नदीप्रवाहात मिसळत असल्याने शेकडो मासे मृत्युमूखी पडत आहेत. हे पाणी पुढे तांबुळवाडी, बसर्गे, माणगाव या भागात जात असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तर या मळीमिश्रीत पाण्यामुळे माणगावपर्यंतच्या प्रवाहात मासे मरून पडल्याचे दिसून येत आहे. त्यांचा प्रचंड वास सुटला असून दुर्गंधी पसरली आहे. तसेच या नदीवर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तालुक्यातील बागडी समाजाचा व्यवसायही यामुळे धोक्यात आला आहे. कोरोना संकटात सापडलेल्या या लोकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे दौलत कारखान्याच्या प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच स्थानिक प्रशासनानेही अद्याप कोणतीही पाहणी केली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीतया घटनेबद्दल चंदगड निसर्गप्रेमींकडून, सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.