कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील महावितरण उपविभाग कळे अंतर्गत तांदूळवाडी येथील शेतकरी महिलेस पहिल्या मोटर विद्युत कनेक्शनची जोडणी करून देण्यात आली. भारती वसंत आळवेकर असे त्यांचे नाव असून यामुळे आळवेकर कुटुंबीयांतून समाधान व्यक्त होत आहे. 

महावितरणच्या नियमानुसार, १ एप्रिल २०१८ पासून ते डिसेंबर २०२० पर्यंत नवीन कनेक्शन देणेसाठी नवीन पोल व डीपी घेणे गरजेचे होते. त्यासाठी येणारा खर्चही लाखात होता. गोरगरीब शेतकऱ्यांना हा खर्च करणे अशक्य होते. परिणामी, राज्यातील हजारो शेतकरी नवीन कनेक्शनपासून वंचित होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने चांगला निर्णय घेतला. ३० मीटरच्या आत कनेक्शन देता येत असेल व लोड शिल्लक असेल तर अशा शेतकऱ्यांना ताबडतोब मोटर विद्युत कनेक्शन जोडणी करून देण्याचे आदेश 15 जानेवारी रोजीच्या जी. आर. नुसार देण्यात आले.

त्यामुळे महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अशा शेतकऱ्यांचा शोध घेत ताबडतोब मोटर वीज कनेक्शन देण्यास सुरुवात केली. तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथील पहिले विद्युत कनेक्शन कनेक्शन शेतकरी महिला भारती वसंत आळवेकर यांना देण्यात आले. आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोटर विद्युत कनेक्शन जोडणी सुरू केली आहे. २६ जानेवारीपर्यंत कळे उपविभाग अंतर्गत ८० ते ९० शेतकऱ्यांना ताबडतोब वीज कनेक्शन देत आहोत, असे उपकार्यकारी अधिकारी एस. पी. पाटणकर यांनी सांगितले.

या वेळी कनिष्ठ अभियंता एन. एन. नागरगोजे, विठ्ठल पाटील (आकुर्डे), सरपंच सर्जेराव कांबळे, उपसरपंच संभाजी गोटम, चेअरमन सरदार पाटील व शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कोल्हापूर परिमंडलचे मुख्य  अभियंता पी. एस. निर्मळे, अधीक्षक अभियंता ए. एच. कावळे, कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.