दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : संसदेच्या चालू अधिवेशन काळात विदेश व्यापार महानिर्देशयालयाच्या अधिकाऱ्यांशी वाणिज्य मंत्रालयामध्ये खा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा ‘एक्सपोर्ट हब’ व्हावा याकरीता ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी (डिएलईपीसी) ची स्थापना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विदेश व्यापार महानिर्देशयालयाशी संलग्न ‘डिस्ट्रिक एक्सपोर्ट प्रमोशन कमिटीची स्थापना करण्यासाठी खा. संजय मंडलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

खा. मंडलिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी, औद्योगिक फौंड्री, डेअरी, हँडक्राफ्ट आदी वस्तूंना जगात मागणी आहे. या समितीच्या स्थापनेमुळे कोल्हापूर जिल्हा हा एक्सपोर्ट हब होणार असल्याने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली या कमिटीची स्थापना लवकरात लवकर करावी असे जिल्हा प्रशासनास कळविले आहे. या कमिटीची स्थापना करीत असताना चेंबर ऑफ कॅामर्स, विविध औद्योगिक संघटना, जिल्हा उद्योग केंद्र, इंजिनीअरिंग, वस्त्रोद्योग आणि कृषी प्रक्रीया इ. घटकांशी विचार विनीमय करावा असेही खास.मंडलिक यांनी कळविले आहे. या समितीमुळे निर्यात वाढीसाठी येणाऱ्या अडचणींचे निरसन करुन निर्यात प्रक्रिया सुलभ होणेकरीता उद्योजकांना सहाय्य होणार आहे.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील खास करुन फौंड्री, इंजिनीअरिंग, वस्त्रोद्योग, कृषी प्रक्रिया, डेअरी, आदी क्षेत्रातील उद्योजकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि निर्यातीकरीता येणाऱ्या समस्यांचे निरसन होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा देशामध्ये अव्वल क्रमांकामध्ये ‘एक्सपोर्ट हब’ म्हणून उदयास येईल अशी आशा खा.मंडलिक यांनी यावेळी व्यक्त केली.