कसबा बावडा (प्रतिनिधी) : सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण देतानाच विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच दक्ष आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच प्लेसमेंटच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने गेल्या ४ वर्षांपासून जापनीज, जर्मन व फ्रेंच भाषाचे शिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी लँग्वेज लॅबही कार्यरत असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी दिली.

विविध जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या या मुलांना आपली भाषा, व्यक्तिमत्व याबाबत उणेपणा जाणवू नये, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. इंग्रजी भाषा व संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी २०१५ मध्ये लँग्वेज लॅबची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर २०१७ मध्ये परदेशी भाषा शिक्षणही सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेचे एन ५ पासून एन ३ पातळीपर्यंतचे प्रमाणपत्र मिळवले असून जर्मन व फ्रेंच भाषेतही ए १ व ए २ पातळी पार केली आहे. या भाषा अवगत असलेल्या अभियंत्यांना बहुराष्ट्रीय कंपन्याकडून मोठी मागणी असून काही विद्यार्थ्याना मोठ्या नोकरीची संधीही मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कौशल्य विकसित करण्यासाठी स्टुडंट क्लब महाविद्यालयात सुरु आहे. यामध्ये आर्ट, क्राफ्ट अँड कल्चर, फोटोग्राफी, अॅडव्हेन्चर, हायर एज्युकेशन, कोडींग अँड प्रोग्रामिंग, हेल्थ अँड फिटनेस, रोबोटिक व मुव्ही असे ८ क्लब सध्या कार्यरत आहेत. या अॅक्टीव्हीटीचा सर्वागीण विकास व प्लेसमेंट्साठी मोठा फायदा होत आहे. कोडींग क्लबचा प्रेसिडंट आकाश पठाडे याने टीसीएस कोडव्हिटा क्रॅक केली आहे. विद्यार्थ्याना सर्वंकष ज्ञान देण्यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग मेहनत घेत असून यंदा कोरोना संकटातही ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याचे डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.