कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शनिवार) सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीने सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. 

आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत ना शिंदे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराची पाहणी केली. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर असून, पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित रु. ८० कोटींच्या निधी पैकी फक्त रु.९ कोटी रुपये निधी मिळाला आहे. उर्वरित निधी लवकरात लवकर मंजूर करावा, अशी विनंती क्षीरसागर यांनी मंत्री शिंदे यांना केली.

यावर ना. शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासनाने पुरातन मंदिरांच्या विकासाचा व देखरेखीचा अधिकार नगरविकास खात्याकडे दिला आहे. त्यामुळे नगरविकास मंत्री या नात्याने श्री अंबाबाई मंदिरात होणाऱ्या दुरुस्तीस आवश्यक परवानगीची आणि लागणाऱ्या निधीची जबाबदारी घेत आहे. मंदिरात झालेल्या पडझडीची किंवा कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव देवस्थान समितीने तातडीने सादर करावा. त्यास निधी देऊन मंदिराची पडझड तत्काळ थांबवू, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.