मुंबई (प्रतिनिधी) : ‘ईडी’च्या नोटीस भाजपच्या लोकांना नाही, तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. त्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने सुरू आहे. सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उद्या कदाचित मलाही ईडीची नोटीस येईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

रोहित पवार  यांनी आज (मंगळवार) पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली.  यावेळी त्यांनी माथाडी कामगार, व्यापाऱ्यांशी चर्चा करून  त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे यावेळी त्यांनी सांगितले. हे मार्केट कसे चालते, याच्यात काय अडचणी आहेत. तसेच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण भेट दिल्याचे पवार यांनी सांगितले.