कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेला नंबर वन बनविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केले. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रारंभी कोल्हापूर महापालिकेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, महापालिकेचे प्रशासन कसे गतीमान होईल, यासाठी प्राधान्य राहील. देशामध्ये कोल्हापूर महापालिका एक नंबरला कशी येईल यासाठी सर्वांनी मिळून चांगले काम करुया. आपण दूरदृष्टी ठेवून विकासात्मक कामे केल्यास शहराचा नक्कीच विकास होईल. शहरातील नागरिकांच्या महापालिकेकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, नगरसचिव सुनिल बिद्रे, अंतर्गत लेखापरिक्षक संजय भोसले आदीसह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.