कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील प्राथमिक आरोग्य पथकाद्वारे आसपासच्या गावांना आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जातात. पण नोव्हेंबर २०१९ पासून येथे काम करणारे वैद्यकीय अधिकारी दीपक चंद्रशेखर बळवतकर यांच्या कार्यपद्धतीवरून तेथील कर्मचारी व परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. कर्मचाऱ्यांनी याबाबतची तक्रार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागांना दिली आहे. त्यानुसार, आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी सुळे येथे येऊन नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. सखोल चौकशीअंती पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

डॉ. दिपक बळवतकर हे कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत आहेत व सतत नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत आहेत. महिला कर्मचारी व रुग्णांना देखील चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप कर्मचारी व नागरिकांनी निवेदनात केला होता. डॉ. देसाई यांनी मच्छिंद्र पाटील, अनिल पाटील, दिनकर पाटील, शामराव पाटील, महादेव पाटील,छाया पाटील, नथुराम पाटील (आकुर्डे), सुरेश पाटील (गोठे) यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.

देसाई यांनी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात या प्रकरणी गावात दोन गट पडले आहेत. विरोधकांनी डॉ. बळवतकर यांची बदली करावी, अशी मागणी केली असून सत्ताधारी गटाने मात्र डॉ. बळवतकर हे याच ठिकाणी काम करतील, अशी भूमिका घेतली आहे. गावात या प्रकरणावरुन दुफळी निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन हा पेच सोडवावा, अशी मागणी होत आहे.