मुंबई (प्रतिनिधी) : बलात्कार,  लैंगिक अत्याचार यांसारख्या तक्रारीवर तत्काळ एफआयआर नोंदवून नंतर चौकशी करण्याचे बंधनकारक सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना केले आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते व  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात महिलेने केलेल्या बलात्काराच्या  तक्रारीवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.  त्यामुळे  ही दिरंगाई पोलिसांना भोवण्याची शक्यता आहे.  

कोणताही दखलपात्र गुन्हा असेल, तर तत्काळ एफआयआर नोंदवून घेण्याचे बंधनकारक सर्वोच्च न्यायालयाने ललिताकुमारी निवाड्याद्वारे पोलिसांना केले आहे. धनंजय मुंडे  यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात केलेली ही तक्रार पोलीस आयुक्त,  पोलीस महासंचालक,  गृहमंत्री,  मुख्यमंत्री, राज्यपाल ते थेट पंतप्रधान कार्यालयातही पाठवली आहे. लेखी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई  करण्याबाबत हालचाली सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना हे प्रकऱण भोवण्याची शक्यता आहे.