कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर उद्यापासून (सोमवार) भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. पण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्यात रोज केवळ ३ हजार भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. मंदिरात प्रवेश दिल्यानंतरही पितळी उंबऱ्यापर्यंतच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. आणखी काही दिवस गाभाऱ्यातून प्रवेश बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, गेल्या ८ महिन्यांपासून अंबाबाई मंदिर बंद होते. सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून मंदिर खुले करण्यात येईल. पण मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ २ ते ३ हजार भाविकांना दररोज दर्शन देण्यात येणार आहे. यासंबंधी नेटके नियोजन देवस्थान समितीने केले आहे. पूर्व दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर अशी व्यवस्था राहील.

मंदिरातील इतर परिसरात सुद्धा भक्तांना फिरता येणार नाही. त्यासाठी बॅरिगेट लावण्यात येणार आहेत. मंदिरामध्ये असलेली सर्व दुकानेसुद्धा बंदच असतील. कोरोनासंबंधीची प्राथमिक तपासणी करून भक्तांना प्रवेश दिला जाईल. मास्क नसेल त्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मंदिर परिसरात गेल्यानंतरही मास्क काढल्यास कारवाई होईल. परजिल्हा, राज्यातूनही भक्त मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यांच्यासाठी दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. हे बुकिंग विनामूल्य असेल. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यांनी दर्शनासाठी येऊ नये, असेही त्यांनी सांगितले.