कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री जोतिबा, दत्त भिक्षालिंगसह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. आजपासून (शुक्रवार) त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे अभिषेकही पुन्हा सुरू झाले आहेत आणि भाविकांना ओटीचे साहित्य मंदिरात नेण्यास मुभा देण्यात आली आहे.

काल (गुरुवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची मासिक बैठक मुख्य कार्यालयात पार पडली.  या बैठकीत श्री अंबाबाई, केदारलिंग जोतिबा, दत्त भिक्षालिंग, ओढ्यावरील सिध्दीविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरातील दर्शन वेळ सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी चार ते सायंकाळी सात अशी होती. ती शुक्रवार दि. ११ पासून सकाळी सात ते दुपारी दोन व सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांना मंदिरात ओटी साहित्य नेण्याची मुभा देण्यात आली. भाविकांसाठी बंद असलेले अभिषेकही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

देवस्थान समितीच्या अखत्यारीतील उर्वरित मंदिरांच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमिती निर्णय घेईल अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व समितीच्या सदस्यांनी दिली.