शासकीय, निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये १ वर्ष वयोमर्यादा वाढविण्याची मागणी

0
36

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशभरात आणि राज्यावर कोरोनाचे भयानक संकट असून त्यामध्ये तरूण पिढीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय आणि निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये एक वर्ष वयोमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी (ता. हातकणंगले) गावचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, जगात कोरोनासारखे भयंकर संकट देशावर आणि राज्यावर आले आहे. यामध्ये तरुण पिढीचे खूप नुकसान झाले आहे. मार्चपासून शिक्षण व्यवस्था व्यवसाय रोजगार शासकीय भरती बंद आहे. आज तरुण पिढीचे खूप हाल होत आहेत. सर्व तरुणवर्ग आपल्या गावी आहेत. सध्या जिवंत राहणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. यामध्ये सर्व शासकीय आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे तरुण-तरुणी आपल्या गावी घरी आहेत.

शिवाय अभ्यासासाठी ऑनलाईन क्लास सुरू आहेत, पण आवश्यक तेवढी सोय होत नाही. नेटवर्क आणि माहितीचा अभाव यामुळे खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारकडून कोणतेही भरतीची परीक्षांची घोषणा झाली नाही. त्यामुळे सर्व संभ्रमात आहेत. त्याचबरोबर आर्थिक बाजू कमकुवत असणारे तरुण आणि वयोमर्यादा येत्या २-३ महिन्यात संपणार आहे, असे सर्व तरुण बेरोजागारीशी लढत आहेत. ज्या तरुण पिढीचे वय मर्यादा संपणार आहे, अशा सर्व तरुणांना रोजगार मिळणार नाही. यामध्ये राज्य सरकारने लक्ष केंद्रित करून सुरू वयोगटात १ वर्ष वाढवावे, असे या लेखी निवेदनात नमूद केले आहे.

जागतिक मंदी आणि कोरोना महामारी यामुळे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने चालू वयोगटात एक वर्ष वयोमर्यादा सर्व जाती आणि आरक्षित जागेच्या मर्यादे मध्ये एक वर्ष वाढवण्यात यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here