कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावरील वाहतूक दिवसा एकेरी करावी किंवा ड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता बंद करावा, अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे, राकेश पाटील, रियाज बागवान आदींच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे आणि वाहतूक निरीक्षक अनिल गुजर यांना देण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम बरेच वर्ष प्रलंबित होते. जनआंदोलनामुळे गंगावेस ते शुक्रवार गेटपर्यंत काम पूर्ण झाले असून शुक्रवार गेट ते शिवाजी पूल काम सुरू असून पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शन व ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यामुळे रात्रीची अवजड वाहतूक व ऊस वाहतूक बंद केली आहे. पण रात्रीच्या वेळी वाहतूक पोलीस नसताना किंवा सकाळी सहानंतर ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीतून राजरोज सुरू आहे. रस्ता उकरल्याने वाहतुकीस अडचण व अडथळे येत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

या प्रश्नांवर लवकरच योग्य कार्यवाही करु, असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे दिले. यावेळी महेश कामत, सुरेश कदम, सनी अतिग्रे, युवराज जाधव आदी उपस्थित होते.