नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे संक्रमण वाढत आहे. प्रतिबंधक लस तयार करण्यात देशातील कंपन्यांना यश आले आहे, त्यामुळे देशभरात लसीकरण सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता १३ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. आता केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर १० दिवसांनी लसीकरण अभियान सुरू करण्याची योजना आरोग्य मंत्रालयानं तयार केली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी ३ जानेवारीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार १३ जानेवारीला लसीकरण अभियान सुरू करण्याचे संकेत आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचंही भूषण यांनी नमूद केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.