कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान ग्रामपंचायत चौकात झेंड्याच्या कट्यावर चढून ढोल वाजवल्याच्या कारणावरून एकाला लाथाबुक्यांनी माराहण केली. हा प्रकार रजपूतवाडी (ता. करवीर) येथे घडला. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

परशराम चव्हाण, रोहित चव्हाण, अक्षय चव्हाण, बंडा तळेकर, गजानन चव्हाण, जीवन चव्हाण, कर्नल रजपूत, सुरज रजपूत, बंडा चव्हाण, अक्षय चव्हाण (सर्व रा. रजपूतवाडी ता. करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी प्रविण सखाराम कांबळे (वय ३१ रा. रजपूतवाडी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रजपूतवाडीवाडीत शुक्रवारी फिर्यादी प्रविण कांबळे यांच्या वीर हनुमान तरुण मंडळाचा गणपती ढोल ताशांच्या  गजरात ग्रामपंचायत चौकातून जात होता. यावेळी सागर पोवार याने चौकातील झेंड्याच्या कट्यावर चढून ढोल वाजवण्यास सुरुवात केली असता संशयित आरोपींनी त्याला कट्ट्यावर का चढलास असे म्हणत लाथाबुक्यानी माराहण करण्यास सुरुवात केली. दरम्यान फिर्यादी प्रविण कांबळे व त्याचा भाऊ राहुल कांबळे भांडण  सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही यावेळी मारहाण केली. पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.