नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लस देशामध्ये येण्याआधीच त्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. कोरोना लसीसंदर्भात हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी काही आक्षेप नोंदवले आहे. या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याचा दावा करत ही लस वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे. यासंदर्भात थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणी यांनी निवेदनही दिल्याचे वृत्त आहे.

जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली हे स्पष्टपणे सांगितले जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. पण आपला धर्म यासाठी भ्रष्ट करता येणार नाही. कोणतीही कंपनी जेव्हा एखादे औषध बनवते, तेव्हा त्यामध्ये काय वापरण्यात आले आहे याची माहिती देते. मग कोरोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करू दिली जात नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जी लस अमेरिकेमध्ये तयार करण्यात आली आहे, त्यामध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याचा दावा असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.