कोल्हापूर (प्रतिक्रिया) : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोव्हॅक्‍सिीन लस आज (बुधवार) कोल्हापुरात दाखल झाली. येत्या काही तासात लसीकरण सुरू होणार आहे. त्यानुसारच जिल्ह्यातील शासकीय कोरोना योध्यांना हे लसीकरण होईल. त्यासाठी पुणे आरोग्य विभागाकडून ३७ हजार ५८० डोस कोल्हापुरात पाठवले आहेत.

कोल्ड पॅकिंग व्हॅनव्दारे या लस येथे आणण्यात आल्या. त्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक कोल्ड व्हॅनसह पुण्याला गेले होते ते आज लस घेऊन परतले आहे. आणलेल्या लस या वैद्यकीय शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यात सीपीआर रूग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, सेवा रूग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल व पुलाची शिरोली आरोग्य केंद्र आदी २५ ठिकाणी शासकीय सेवेतील हे लसीकरण होणार आहे.

रूग्णालयांतील तीन कक्ष आहेत, यात एका कक्षात कोरोना योध्यांचे ओळखपत्र तपासणी होईल दुसऱ्या कक्षात लसीकरण होईल. तिसऱ्या कक्षात संबंधित योध्याला विश्रांती देण्यात येणार आहे. अशा तीन टप्प्यांमध्ये आरोग्य विभागाचे डॉक्‍टर्स व वैद्यकीय कर्मचारी लसीकरण करतील. या लसीकरण कामकाजाची अंतिम नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर काम करणारे कोरोना योद्धे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जेजे घटक कार्यरत आहेत. अशांना लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी २५ हजार व्यक्तींची नाव नोंदणी व सर्वेक्षण झाले आहे. येत्या पंधरा दिवसातच लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पूर्ण क्षमतेने होईल, अशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.