जम्मू  (वृत्तसंस्था) :  माजी राज्यसभा खासदार  व काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी  करत  जम्मूमध्ये त्यांचा पुतळा जाळला. यावेळी काँग्रेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.    

गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच पक्ष नेतृत्वाविरोधात विधान केले होते. याबद्दल पक्ष कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जम्मूत रस्त्यावर उतरले आणि  आझाद पक्षाविरुद्ध कारवाया करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली जी – २३ नेते जम्मूत एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी आझाद यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते. आपल्या मुळाचा गर्व असलेल्या, चहा विक्रेत्याच्या आपल्या भूतकाळाबद्दल खुलेपणाने स्वीकारणारे पंतप्रधान मोदींसारखे नेते आपल्याला भावले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाच्या भवितव्याबद्दल  त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले होते.