पंचगंगा प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका… : मुख्यमंत्री

0
126

मुंबई (प्रतिनिधी) : पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी आज (मंगळवार) पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जिल्ह्यातील नेते आणि जिल्हाधिकारी यांचेसमवेत बैठक पार पडली. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर झाला असल्याबद्दलचे नेत्यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत नदी प्रदूषण रोखण्यासाठी जबाबदार सर्व घटकांवर कडक कारवाई करा, प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना पुन्हा युनिट सुरू करण्यास परवानगी द्या, असे स्पष्ट निर्देश दिले. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांच्या पथकाने संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवून दर महिन्याला अहवाल सादर करावे, असे ठरले. त्याचप्रमाणे सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यासह अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here