कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा  येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कोल्हापूर महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर चौक ते कळंबा कारागृह या परिसरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियानानंतर गोळा केलेल्या जवळपास दोन टन कचऱ्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विल्हेवाट लावण्यात आली.

संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे, उपप्राचार्य दत्ता पाठक, अनिल बामणे व आरोग्य विभागाचे जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे समन्वयक अमोल आंबी व उत्तम माने यांनी या स्वच्छता अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामध्ये एनएसएस विभागाच्या ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. आयटीआय विभागातील सर्व कर्मचारी आणि मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले.