कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील दारूण पराभव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातच त्यांना पक्षातून घरचा आहेर मिळू लागला आहे. पाटील यांनी झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीसुध्दा या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी बुवा आणि पाटील यांनी केली आहे. आता यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला अवघ्या २ जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर महाविकास आघाडीने ४ जागांवर विजय मिळवत भाजपला चितपट केले होते. पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडले. विशेष करून पुणे या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या मतदार संघातील निवडणुकीसाठी पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यांचे सर्व मनसुबे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उधळून लावले. या मतदारसंघातील पराभव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातूनच होऊ लागली आहे.