कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी साजरी होत आहे. प्रशासनाने फटाके वाजविण्यावर बंधने आणली आहेत. तरीही फटाक्यांचा धूर निघणारच, हे फटके खरेदी कऱण्यासाठी झालेल्या नागरिकांच्या गर्दीवरून दिसून येते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अनिवार्य झाला आहे. त्यातच सॅनिटायजर लावून फटाके वाजविल्यास जीवावर बेतू शकते. कारण सॅनिटायझर अतिसंवेदनशील ज्वालागृही आहे. त्यामुळे मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फटाके वाजवताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

सध्या सर्वत्र दिपावलीचा माहोल सुरू आहे. दिवाळी म्हटलं की फटाके वाजवणे आलेच. दरवर्षी फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर फटाक्यांवर मर्यादा घालण्यात आल्या असून ठराविक वेळेतच शासनाने सांगितलेल्या ग्रीन फटाके वाजवण्यास परवानगी दिली आहे. कोरोनामुळे सॅनिटायझरचा वापर वाढला असून वारंवार हाताला सॅनिटायझर लावले जाते. दरम्यान, फटाके वाजवताना सॅनिटायझर लावले असेल तर पेट घेण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी फटाके वाजवताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषता लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. दिवाळीचा सण साध्या पद्धतीने आणि प्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करावा. फटाके वाजवताना सॅनिटायझरचा वापर करण्यात येऊ नये.