कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये  करिअर कट्टा राबवण्यात येत आहे. यामध्ये आयएएस आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम १ मार्चपासून ३६५ दिवस दररोज एक तास या पद्धतीने ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी दिली.

या माध्यमातून राज्यातील सर्व प्रशासकीय सेवेसाठीच्या आवश्यक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन व्हावे. यासाठी दिल्लीतील सर्व मराठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संस्था पुढच पाऊलही सहकार्य करणार आहे. महाराष्ट्रातील सॅटर्डे क्लब हा नामवंत उद्योजकांचा असणारा ग्रुप महाविद्यालयीन युवकांना उद्योजकीय कौशल्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शिक्षकांच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी एक अभिनव उपक्रम आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा  या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे.

अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देशातील पहिले मंत्री तर महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. आजपर्यंत राज्यामध्ये या योजनेअंतर्गत ८०० पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये सदर कक्षासाठी समन्वयक नियुक्ती झालेली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी देखील केलेली आहे. उर्वरित महाविद्यालयांमध्ये लवकरच हे कक्ष कार्यान्वित होतील अशी माहिती यशवंत शितोळे यांनी दिली.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे,  मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव विकास खारगे, शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने,  तंत्रशिक्षण विभाग मुंबईचे संचालक अभय वाघ, पुढचे पाऊलचे अध्यक्ष प्रफुल्ल पाठक उपस्थित होते.