मुंबई (प्रतिनिधी)  : हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे, हीच या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर १८ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद झाले, तर २५० हून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. याशिवाय, आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.