मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या सरकारपेक्षा मोगलाई काय वेगळी आहे काय ? असा प्रश्न करून वनमंत्री संजय राठोड, कोविड काळातील भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरणार असल्याचे संकेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिले.

राज्याची विस्कटलेली घडी कशी सावरायची हे समजत नसल्याने राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. कुठलीही चर्चा होऊ नये, अशा प्रकारचे धोरण हे सरकारने बनवले आहे. सरकारमध्ये बदल्या आणि बदल्याच्या बोल्या लागत आहेत. प्रचंड मोठा भ्रष्टाचार बदल्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आयएएस व आयपीएसच्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच संजय राठोड प्रकरणावर आवाज उठविणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे राहणार आहे. सरकारमधील मंत्री लैंगिक स्वैराचार करत असताना त्यांना अभय दिले जात आहे. हे सरकार लाचार झाले आहे. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे भाजपकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.