गारगोटी (प्रतिनिधी) : कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल माफ व्हावे आणि वीज कनेक्शन खंडित करण्याची कारवाई त्वरित थांबवावी, अशा मागण्या करीत भुदरगड भाजपच्या वतीने गारगोटी कोल्हापूर रोडवर आज (सोमवार) रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. 

भुदरगड तालुक्यात महावितरणने अन्यायकारकपणे वीज बिलांची वसुली चालू केली असून ज्यांची बिल थकीत आहेत त्यांची कनेक्शन तोडणेची कारवाई सुरु केली. या विरोधात भुदरगड भाजप तालुकाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महावितरणने कोरोनाच्या काळात मीटर रीडिंग घेतले नसताना सुद्धा हजारो रुपयांची वीज बिले बेकायदेशीररित्या दिली. ही बिले अन्यायकारक असून जनतेची ही लूट आहे. महावितरणने ही कारवाई त्वरित थांबवली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

त्या नंतर महावितरणचे उपअभियंता पवार यांनी आंदोलन स्थळी येऊन ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे नायब तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येऊन  निवेदन स्वीकारले.

या आंदोलनामध्ये प्रवीणसिंह सावंत, ‘बिद्री’चे संचालक धोंडीराम मगदूम, कूरचे सरपंच वसंतराव प्रभावळे, सदाशिव देवर्डेकर, भाजपा सरचिटणीस अनिल तळकर, सरपंच संदेश भोपळे, भाजप शहराध्यक्ष प्रकाशराव वास्कर, पार्थ सावंत, प्रताप मेगाणे, दगडू राऊळ, सुरेश खोत, नारायण पाटील, संदीप पाटील,  मारुती पाटील, सर्जेराव देसाई आदी सहभागी झाले होते.